वाळू माफीया भरून घेत आहेत लाखो रुपयांचे डिझेल
पैठण, (प्रतिनिधी): शहरात पेट्रोल टंचाई निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. काही वाहनधारक पेट्रोल, डिझेल भरून गेल्यानंतर ते घरी पेट्रोल, डिझेल काढून घेऊन पुन्हा पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. तर वाळू माफीया हे लाखो रुपयाचे डिझेल हायवामध्ये व बॅरल मध्ये भरून घेताना दिसत आहेत. याकडे तहसील कार्यालयाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनटंचाई होणार असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांनी घाबरून पेट्रोल डिझेलचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी शहरातील विविध पेट्रोल पंपांवर दिवसभर रांगा लागल्या असून काही ठिकाणी झुंबड उडत असल्याचे चित्र दिसत आहे.
दोन दिवसांपासून परिस्थिती अधिक तीव्र झाली असून, नेहमी एक दोन लिटर पेट्रोल घेणारे वाहनधारक आता पाच ते दहा लिटरपर्यंत पेट्रोल भरून घेत आहेत. इतकेच नव्हे तर काही
नागरिक वाहनांशिवाय बाटल्यां, कॅन मध्येही पेट्रोल घेण्याचा प्रयत्न करत असल्याने पंपांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांसोबत विवादाचे प्रकारही घडत वाद आहेत.
स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पंप मालकांना दिवसरात्र पंपावर उपस्थित राहावे लागत आहे. दरम्यान, पेट्रोल पंप मालक विजय पापडीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या शहरातील तसेच परिसरातील पंपांवर गुरुवारपर्यंत पुरेल इतका पेट्रोल साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येण्याची गरज व्यक्त होत आहे.
-- ग्रामीण भागातील पेट्रोल पंप झाले कोरडे --
पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण होऊन दर वाढणार आहे, अशी अफवा पसरल्याने तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे. ग्रामीण भागातील जवळपास सर्व पेट्रोल पंप बंद पडले असल्याने पैठण शहरात वाहनधारकांनी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी गर्दी केली आहे.












